येथे जोडलेल्या सावंतवाडीतील १४ गावांच्या वीज समस्यांवर तोडगा,तात्पुरते मदत सावंतवाडी मध्ये केंद्र सुरू करण्याचे आश्वासन.
कुडाळ प्रतिनिधी
वेंगुर्ले येथे जोडलेल्या सावंतवाडी तालुक्यातील १४ गावांना सध्या भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी २४ जूनपासून सावंतवाडी तालुक्यात वीज वितरणचे समस्या केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांत ही गावे सावंतवाडी तालुक्याला जोडण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळवली जाईल, असे आश्वासन वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी ग्रामस्थ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
आज सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कुडाळ येथील महावितरण अधीक्षक अभियंता राख यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मळेवाड, गुळदुवे, नेमळे, आजगाव, धाकोरे यासह वेंगुर्ले तालुक्यात समाविष्ट असलेल्या १४ गावांच्या विविध वीज समस्या सविस्तरपणे मांडल्या.
प्रमुख मागण्या आणि आश्वासने:
सावंतवाडी तालुक्यात समावेश: रुपेश राऊळ यांनी या चौदा गावांना तात्काळ सावंतवाडी तालुक्याला जोडण्याची मागणी केली, अन्यथा दोन महिन्यांत व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावर अधीक्षक अभियंता राख यांनी, या गावांचा गण अहवाल सादर झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळवण्याचे आश्वासन दिले.
समस्या निवारण केंद्र: गावांच्या प्राथमिक अडचणी दूर करण्यासाठी तात्पुरते समस्या केंद्र सावंतवाडी तालुक्यात सुरू केले जाईल. या केंद्राद्वारे सावंतवाडीचे वीज अधिकारी वेंगुर्ल्याला समस्या कळवून त्या सोडवण्यासाठी समन्वय साधतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
नवीन वीज मीटरची सक्ती नाही: नवीन वीज मीटर बसवण्याची सक्ती करू नये अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.
सुरळीत वीज पुरवठा: तिन्ही तालुक्यांमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यावर लक्ष देण्याची विनंती करण्यात आली. यावर अधीक्षक अभियंता राख यांनी, ३३ केव्ही लाईनवरील झाडेझुडपे काढणे आणि सबस्टेशन फिडरमधील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या असल्याचे सांगितले. एप्रिल-मे महिन्यात कर्मचाऱ्यांनी झाडे न तोडल्याने आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्याने अडचणी आल्याचे त्यांनी मान्य केले.चौकशीचे आदेश: वीज अधिकारी शिंदे व वीज कर्मचारी धोंड यांची सखोल चौकशी केली जाईल असेही राख यांनी स्पष्ट केले.
यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, आबा केरकर, उदय पारीपत्ये यांनी विविध समस्या व अडचणी मांडल्या. तसेच शब्बीर मणियार, मनोहर आरोंदेकर, बाळू माळकर, गोविंद केरकर, विद्याधर नाईक, निवृत्ती नाईक, संतोष पेडणेकर, सौ सुभद्रा नाईक, शिल्पा नाईक, स्मिताली नाईक, सिद्धू नाईक, सचिन मुळीक, निदात पांगम, दिलीप बहिरे, सखाराम राऊळ, सिद्धेश निंबाळकर, वासुदेव राऊळ, हरेश पेडणेकर, दत्तराज कोरगावकर, शुभम सातार्डेकर, दीपक सातारकर, प्रशांत सातार्डेकर, गौरेश तुळसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या बैठकीमुळे सावंतवाडी तालुक्यातील या १४ गावांच्या वीज समस्यांवर लवकरच तोडगा निघेल अशी आशा रूपेश राऊळ यांनी व्यक्त केली आहे.