सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न.
सावंतवाडी प्रतिनिधी
कोणत्याही गावाचा महत्त्वाचा कणा हा त्या गावाचा पोलीस पाटील असतो. गावात कोणतीही बरी – वाईट घटना घडली तर त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती भूमिका घेण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांना पार पाडावी लागते. म्हणून आदर्श व निकोप ग्रामनिर्मितीसाठी पोलीस पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, असे मत व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले. सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे आयोजित सावंतवाडी तालुक्यातील पोलीस पाटलांच्या कार्यशाळेत प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जयेश खंदरकर, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर तसेच अन्य उपस्थित होते.
दरम्यान यावेळी प्रा. रूपेश पाटील पुढे म्हणाले, आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात अनैतिक गोष्टी घडत असतील तर त्या तात्काळ थांबवण्यासाठी पोलीस पाटील यांनी पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच निकोप व व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठीही पोलीस पाटील यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. गावातील युवकांवर योग्य संस्कार होण्यासाठी तसेच त्यांनी अनैतिक मार्गावर जाऊ नये याकरिता पोलीस पाटील यांची जबाबदारी फार मोठी असून अनेकजन हे कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडतात. अशा पोलीस पाटलांची शासनस्तरावर दखल घेतली जाते व त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते, असेही प्रा. पाटील म्हणाले.
यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सदर कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करून पोलीस पाटील पोलिसांना कशा पद्धतीने मदत करू शकतात?, याचे विश्लेषण केले. सौ. अर्पिता मुंबरकर यांनी समाजातील विविध प्रकारची व्यसने किती घातक आहेत?, हे चित्र प्रदर्शनद्वारे सोदाहरण स्पष्ट केले. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील विविध गावातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा घेतली.