कुडाळ प्रतिनिधी
येथील पोलिस ठाण्यातील दिरंगाई आणि तपासामध्ये
चालढकल होत असल्याच्या निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उद्या ७ ऑगस्ट पासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
बरेगार यांनी ७ एप्रिल २०२१ ला कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु तब्बल १३ महिन्यांनी, १३ मे २०२२ ला या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी तक्रार दाखल करताना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप बरेगार यांनी केला आहे. तसेच, फुलचंद मेंगडे यांनीही चौकशीला विलंब लावला. या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या बरेगार यांनी १२ मे २०२२ ला उपोषण केले होते. त्यावेळी त्यांच्यावरच खोटा एफआयआर दाखल करण्यात आला होता, मात्र त्यांच्या मूळ तक्रारीच्या आधारे तत्कालीन वनपाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणात नियुक्त करण्यात आलेले तपास अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांनी जाणूनबुजून चौकशीला विलंब केल्याचा आरोप बरेगार यांनी केला आहे. यामुळे आरोपी सुनील सावंत यांना मुंबई उच्च न्यायालयातून एफआयआर रद्द करण्यासाठी वेळ मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त, हवालदार महेश अरवारी यांनी ‘बरेगार यांनी जबाब देण्यास नकार दिला’ असा खोटा अहवाल सादर करून तक्रार निकाली काढण्याचा प्रयत्न केला.
या सर्व प्रकारांची तक्रार बरेगार यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत अनेक वेळा झाली, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अहान सादर करूनही १५ महिने उलटूनही त्यावर काहीही कारवाई जयंत बरेगार यांनी सांगितले.
आज डीवायएसपी होम बडवे यांनी उपोषणाच्या संदर्भात बरेगार यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, १५ महिन्यांपासून चौकशी अहवालावर कारवाई का झाली नाही, याचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी उपोषणाचा निर्धार कायम ठेवला आहे.