व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा राज्यातील पत्रकारांसाठी अनोखा उपक्रम

पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर ‘इस्कॉन’मध्ये रंगणार ‘श्रीकृष्ण भक्तीचा मेळा’, पंढरपुरी एकादशीचा खास सोहळा.
सोलापूर : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे राज्य अधिवेशन यंदा शनिवार, दि. १५ आणि रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री. श्री. राधा पंढरीनाथ मंदिर, ‘इस्कॉन’ पंढरपूर येथे सकाळी ९ ते रात्री ११ या वेळेत संपन्न होत आहे.
‘इस्कॉन’मध्ये ‘श्रीकृष्णा’ची भक्ती आणि ‘चंद्रभागे’तीरी एकादशीला ‘पांडुरंगाचे’ दर्शन असा अनोखा कार्यक्रम पंढरपूरात रंगणार आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा यात सहभाग असणार आहे.
महाराष्ट्रातून सुरू झालेली आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ आज ५६ देशांपर्यंत पोहोचली असून तब्बल ६ लाख ७० हजार पत्रकार या संस्थेमध्ये पदाधिकारी, सदस्य म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारांसाठी जगभरात निर्माण झालेली ही केवळ एक सामाजिक चळवळ नसून, पत्रकारांना सक्षम करण्यासाठीचे मोठे व्यासपीठ ठरले आहे.
पत्रकारांचे निवास, आरोग्य, संरक्षण, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवणे तसेच पत्रकारितेची गुणवत्ता आणि व्यावसायिकता उंचावण्याचे काम या व्यासपीठातून घडून आले आहे. देशभरातील पत्रकारांनी पत्रकारांसाठी उभारलेले हे एक ऐतिहासिक व्यासपीठ आहे. १५ नोव्हेंबरला एकादशी असल्यामुळे सर्वांना पांडुरंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
या अधिवेशनासाठी पंढरपूर ‘इस्कॉन’चे अध्यक्ष प्रल्हाद दास यांच्या सहकार्यातून हे अधिवेशन पार पडणार आहे. या प्रसंगी परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचेही अध्यात्मिक मार्गदर्शन लाभणार आहे.
यावेळी अध्यक्ष प्रल्हाद दास म्हणाले, “या अधिवेशनाला घेऊन देश आणि राज्यातील पत्रकारांचा जसा उत्साह शिगेला पोहोचला आहे, तसाच उत्साह आमच्या पंढरपूर ‘इस्कॉन’च्या सर्व टीममध्येही आहे. पंढरपूर ‘इस्कॉन’ हे राज्यातील एक अत्यंत प्रतिष्ठित ठिकाण असून येथे श्रीकृष्णाचे डोळे दिपवणारे मंदिर, प्रसादालयाच्या माध्यमातून होणारे पुण्यकर्म, चंद्रभागेतीरवरील प्रभुपाडा घाट, हे सर्व पाहून येणारे सर्व पत्रकार निश्चितच आनंदून जातील. आम्ही ‘इस्कॉन’च्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक स्तरावर पत्रकारांना एक वेगळा अनुभव देणार आहोत.”
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी ‘इस्कॉन’ पंढरपूर येथे जाऊन सर्व कामाचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्याध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या निमित्ताने सर्व जिल्हाध्यक्षांचा आढावा घेतला आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ पंढरपूरचे प्रमुख आणि राज्य संघटक सुरज सरवदे यांनी यानिमित्ताने पंढरपूर सोलापूर येथील संपूर्ण टीम बांधण्याचे काम सुरु केले आहे.
‘इस्कॉन’ मंदिर ज्या भागात आहे त्या ‘शेगाव’ येथील सरपंच जयलक्ष्मी संतोष माने आणि मंगेश अटकळे, माउली महाराज हांडे हे या अधिवेशनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
महासचिव दिव्या भोसले यांनी या अधिवेशनासाठी येणाऱ्या पाहुण्यांना निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. राज्य कोर टीमचे प्रमुख अजितदादा कुंकूलोळ, चेतन बंडेवार, भीमेश मुतुला,गोरक्षनाथ मदने, किशोर कारंजेकर, कुमार कडलग, नरेंद्र देशमुख, संगम कोटलवार, अरुण ठोंबरे, सचिन मोहिते, अमोल मतकर, रश्मी मारवाडी, वैशाली पाटील, किरण ठाकरे, कल्पेश महाले, मिलिंद टोके, बापू ठाकरे, पल्लवी शेटे हे नियोजनाचे काम करत आहेत.
राज्याचे महासचिव दिगंबर महाले, कार्याध्यक्ष विजय चोरडिया आणि मंगेश खाटीक यांनी या अधिवेशनासाठी निमंत्रित असलेल्या सर्व पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार असून विविध मान्यवरांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता अधिक सक्षम आणि अबाधित कशी राहील, यावर या अधिवेशनात सखोल चर्चा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top