एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा संपन्न!

पंढरपूर प्रतिनिधी
कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा विधीवत संपन्न झाली. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी ही महापूजा सुरू झाली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित होते. तर मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोरे देखील यावेळी उपस्थित होते. तर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेचे दोन शाळकरी मुलं पुजेत सहभागी झाले होते. यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रामराव बसाजी वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना मिळाला.

वालेगावकर दाम्पत्य गेल्या २० वर्षांपासून वारी करत आहे. या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान मिळाल्यानंतर त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. पांडुरंगाच्या कृपेमुळे आम्हाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी मानाचे वारकरी असलेल्या या दाम्पत्याला एक वर्षाचा एस.टी. बस पास भेट म्हणून दिला.

महत्त्वाचे ऑन द स्पॉट निर्णय जाहीर –

या महापूजेनंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक महत्त्वाचे ऑन द स्पॉट निर्णय जाहीर केले. यासोबतच एकनाथ शिंदेंनी राज्यातील शेतकऱ्यांवरील अरिष्ट दूर व्हावे, बळीराजा सुखी व्हावा आणि महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रांत देशात नंबर एक व्हावे, असे साकडे विठ्ठलाकडे घातले. तसेच एकनाथ शिंदेंनी पूजेचा मान आणि संधी चौथ्यांदा मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या ठिकाणी व्हीआयपी लोक आम्ही नाही. याठिकाणी वारकरी व्हीआयपी आहेत. मी देखील शेतकरी व वारकरी कुटुंबातून आलो आहे. एक सामान्य कार्यकर्ता आणि शाखाप्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणे ही पांडुरंगाचीच कृपा आहे. चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, ही वारकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले.

आषाढीची महापूजा करायला आवडेल –

पंढरपूरच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ५ कोटी रुपये तातडीने दिले. तसेच मंदिर समितीला पर्यटक निवासाची जागा ३० वर्षांसाठी करार वाढवून देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी जाहीर केला. आषाढीची महापूजा करायला आवडेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महापूजेनंतर प्रतिक्रिया दिली. तसेच आगामी निवडणुकीसाठी विठ्ठल एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद देईल, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top