सावंतवाडी प्रतिनिधी
तिकीट न मिळाल्याची चिंता नसून, सावंतवाडीतील मतदार आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील, असा ठाम विश्वास त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नगरपालिकेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. माझे शहर माझी जबाबदारी,एकच ध्यास सावंतवाडीचा विकास हा आपला मुख्य नारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोजगार निर्मिती आणि विकासाचे ध्येय कोरगावकर यांनी शहराच्या विकासासोबतच युवक आणि महिलांच्या सक्षमीकरणाला आपले प्रमुख प्राधान्य असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, हजारो मुलं शिक्षण पूर्ण करून रोजगारासाठी परजिल्ह्यात, परराज्यात किंवा विदेशात जात आहेत. मी स्वतः कृषी सेवा केंद्र आणि अन्नपूर्णा टेक सोर्स आयटी कंपनीच्या माध्यमातून १२० हून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यापुढे १२ हजार मुलांना रोजगार देण्याचा आपला महत्त्वाकांक्षी हेतू असून, त्यासाठी स्कीलर डेव्हलपमेंटला (कौशल्य विकास) प्राधान्य देण्याचा मानस आहे. युवक आणि महिला हे माझ्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. मूलभूत सुविधा आणि आरोग्य सेवेवर लक्ष शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सौ. कोरगावकर यांनी सांगितले. अंडरग्राऊंड वीज वाहिनी, बाजारपेठ सुधारणा आणि पाणी प्रश्न यांसारख्या विकासाचे चांगले उद्देश समोर ठेवून आपण निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य सेवेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, गोव्यात जाणारे रुग्ण चिंताजनक असतात. त्यादृष्टीने सावंतवाडीत उत्कृष्ट रुग्णालय व्हावे यासाठी माझा पुढाकार असेल. गेल्या १३ वर्षांपासून आपण दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा देत आहोत. निवडून आल्यास सावंतवाडी शहरासाठी भरघोस विकास निधी आणण्याचा आपला मानस असून, कामाचा अनुभव आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेच्या प्रेमावर आणि विजयावर विश्वास सर्वपक्षीय जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास सौ. कोरगावकर यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “यापूर्वीही मी अपक्ष लढून भाजपला पाठिंबा दिला होता. आताही मी लढणार आणि जनतेच्या बळावर विजय मिळवणार.” जनतेची सेवक म्हणून काम करण्याची आपली भूमिका असून, ‘मेणबत्ती’ चिन्हासाठी आपण मागणी केली आहे
