राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करावा..

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी..

वैभववाडी,ता.१९:
ग्राहकांचे हक्क आणि अधिकारांचे रक्षण करणारा ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ रोजी पास झाला.
त्याचा जागर म्हणून २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो.
तसेच १५ मार्च १९६२ रोजी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या हक्काची जाहीरनामा प्रसिद्ध केला म्हणून १५ मार्च हा दिवस “जागतिक ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन आणि १५ मार्च जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरे करावेत अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे मेल आणि पत्राद्वारे केली आहे. या मागणीचा मेल जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सिंधुदुर्ग आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना पाठवला आहे. हे दोन्ही ग्राहक दिन शासकीय, निमशासकीय आस्थापना विभाग, शैक्षणिक संस्था व ग्राहक चळवळ संबंधित संस्था साजरे करतात.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था महाराष्ट्रभर ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यरत आहेत. संवाद समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था कार्य करीत आहे.
दि.२४ डिसेंबर रोजी “राष्ट्रीय ग्राहक दिन” आणि दि.२४ ते ३० डिसेंबर हा “ग्राहक सप्ताह” म्हणून साजरा केला जातो. जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हास्तरावर आणि सर्व तहसिल कार्यालयांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात यावा. काही तहसिल कार्यालयामध्ये आपल्या सोईने आणि औपचारिकता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सर्वसामान्य ग्राहक राजाला जागृत करण्यासाठी शासकीय पातळीवर हा दिवस एक “राष्ट्रीय उत्सव” म्हणून साजरा झाला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांशी अर्थात ग्राहकांशी संबंधित विविध क्षेत्रातील आस्थापना प्रमुखांना आमंत्रित करून हा दिवस साजरा करण्यात यावा, जेणेकरुन ग्राहक संरक्षण कायद्याचा खरा उद्देश सफल होण्यास मदत होईल. तसेच या कार्यक्रमांच्या वेळी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमे बरोबरच भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात यावे, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री.सीताराम कुडतरकर, संघटक श्री.विष्णुप्रसाद दळवी व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top