कलंबिस्त हायस्कूलच्या पालकसभेत ‘सजग पालकत्व’ विषयावर व्याख्यान संपन्न.
सावंतवाडी प्रतिनिधी
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक मुलाला आधुनिक पद्धतीने जागृत राहून शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे. मुलांच्या भवितव्यासाठी पालकांचीही नैतिक जबाबदारी तेवढीच वाढली आहे. आपल्या मुलांना भविष्यात सुयोग्य दिशा प्राप्त करून द्यावयाची असेल आणि त्यांना आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी पालकांची सजगता तेवढीच गरजेची आहे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त हायस्कूलमध्ये पालक – शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.
कलंबिस्त प्रशालेत नुकतीच पालक -शिक्षक सभा संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘ सजग पालकत्व’ या विषयावर व्याख्याते प्रा. रुपेश पाटील बोलत होते.
यावेळी प्रा. पाटील यांनी पालक तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच करिअर निश्चिती करुन त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नरत राहिले पाहिजे. मोबाईल व टीव्हीचा वापर मर्यादित व गरजेपूरता केला पाहिजे. पालक म्हणून विद्यार्थ्यांना घडवताना पालकांनी फार सजगपणे व जबाबदारीने वागले पाहिजे. त्यांच्या शिक्षण आरोग्य, संस्कार यांबाबत पालकांनी दक्ष राहून स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील बदलांची जाणीव करून देत अत्यंत मिश्किल व खुमासदार शैलीत प्रा. पाटील यांनी उपस्थित पालकांना आपल्या जगण्याचे स्टॅंडर्ड वाढवा, वास्तवाचे भान राखा, असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर पालक – शिक्षक संघ कार्यकारिणीचे सत्यविजय राऊळ, महादेव मेस्त्री, सुचिता वर्दम, हेमलता मेस्त्री, संजना बिडये, अश्विनी गोसावी, मलप्रभा गुरव, सुभाष राऊळ प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, ज्येष्ठ शिक्षक शरद सावंत, सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व सभेचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पालक शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्याप्रमाणे छ. शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा व शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. प्रशालेला विविध स्वरुपात लाभलेल्या देणगीदारांचा आढावा शिक्षिका विनिता कविटकर यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक किशोर वालावलकर यांनी तर आभारप्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले.