कुडाळ तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक घटना;जंगलात आढळला तरूणीचा मृतदेह

प्रेम प्रकरणातून गळा दाबून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आरोपीला या गुन्ह्यात अन्य कोणी मदत केली,या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय दीक्षा बागवे या तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. प्रेम प्रकरणातून तिची निघृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय असून, पोलिसांनी या प्रकरणी कुणाल कुंभार नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

२ ऑगस्टपासून बेपत्ता होती दीक्षा बागवे

कुडाळमधील घावनळे गावात राहणारी दीक्षा बागवे ही तरुणी २ ऑगस्टपासून अचानक बेपत्ता झाली होती. ती घरात कोणालाही न सांगता बाहेर गेली आणि त्यानंतर तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती आणि तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते. दीक्षा बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

माणगाव खोऱ्यातील जंगलात आढळला मृतदेह

दीक्षा बेपत्ता झाल्यानंतर दोन महिन्यांनी, म्हणजेच आता माणगाव खोऱ्यातील गोठोस गावाजवळच्या जंगलात तिचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना काही गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
गळा दाबून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने प्रेम प्रकरणातून दीक्षाची हत्या केल्याची कबुली दिल्याचं समजतं. जंगलातील एका शेतात नेत तिचा गळा दाबून खून केल्याचं उघड झालं आहे.

हत्या केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कुणाल कुंभार या तरुणाला अटक केली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि तज्ज्ञांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आरोपीला या गुन्ह्यात अन्य कोणी मदत केली होती का आणि नक्की कधी ही हत्या करण्यात आली, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. दीक्षाच्या हत्येच्या बातमीने तिच्या कुटुंबीयांना आणि गावातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top