घर घर संविधान’ कार्यक्रमातून संविधानाची महती लोकांपर्यंत पोहोचणार

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी
भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे. देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक रचना कशी असावी, नागरिकांना कोणते हक्क असावेत याचे दिशादर्शन संविधान करते. भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदे सांगणारे दस्तऐवज आहे. देशाची राजकीय रचना, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच शासनप्रणाली कशी चालवायची याचे स्पष्ट मार्गदर्शन संविधान करते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृत झालेल्या आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेल्या या संविधानात लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, न्याय, स्वातंत्र्य आणि समानता यांचा आधारभूत विचार आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले हक्क, स्वातंत्र्य आणि न्यायाचे महत्त्व जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. ‘घर घर संविधान’ उपक्रमामुळे संविधानाची महती घराघरात पोहोचेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला.

भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘संविधान अमृत महोत्सव’ अंतर्गत समाज कल्याण विभागाने ‘घर घर संविधान’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे उपस्थित होत्या.

या उपक्रमाचा भाग म्हणून, सोमवारी, ८ डिसेंबर २०२५ रोजी बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज, कुडाळ येथे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

‘संविधानाने आपल्याला काय दिले’ या विषयावर डॉ कोकाटे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

मुख्य वक्ते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भारतीय संविधानाचा प्रवास आणि त्यातून नागरिकांना मिळालेले अमूल्य योगदान समजावून सांगितले. त्यांनी नागरिकांना मिळालेले सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांची महती विषद केली. ‘संविधानाने केवळ हक्कच नाही, तर सशक्त राष्ट्र उभारणीसाठी नागरिकांची कर्तव्येही दिली आहेत’, असे त्यांनी यावेळी सांगितले.
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी ‘घर घर संविधान’ या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील, आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थाचे चेअरमन उमेश गावळनकर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विशेष अधिकारी तुषार गवळी यांनी मानले .कार्यक्रमाचे सूत्र संचालन आनंद कर्पे यांनी केले. या व्याख्यानाला शिक्षक ,विद्यार्थी, तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top