सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांची पहिली बैठक घेऊन त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुंबई यांचेकडील पत्रान्वये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक घेण्यासाठी पहिली बैठक दिनांक 20 मार्च 2026 पूर्वी आयोजित करण्याबाबत कळविलेले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक श्री .छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे 16 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधारण या प्रवर्गाकरीता राखीव असून त्याचा कालावधी हा अडीच वर्षाचा आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तसेच नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती यांना या सभेस उपस्थित राहण्याबाबत या कार्यालयाकडून तसेच संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत नोटिसद्वारे कळविण्यात आलेले आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी येथे 16 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
