मुख्यमंत्र्यांचा बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठकीत कोकणविकासासाठी महत्वपूर्ण निर्णय
नागपूर :
अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी या निर्णयाबाबत विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली.रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी या रेल्वे मार्गाबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.
या निर्णयाबद्दल नागपूर विधान भवनात माध्यमांशी संवाद साधतना मंत्री नितेश राणे म्हणाले, वैभववाडी ते कोल्हापूर असा रेल्वे मार्ग राज्य शासनामार्फत करण्याचा निर्णय आणि त्यासंबंधीत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हा निर्णय केवळ कोकणासाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे विकासाची असंख्य दालने उघडणार आहेत. प्रामुख्याने कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळेल. पर्यटनात वाढ, पूर आणि भुस्खलनाच्या काळात दळणवळणाची पर्यायी सुविधा म्हणून हा मार्ग उपयुक्त ठरेल. याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती राणे यांनी दिली.
