मुंबई विद्यापीठ व खर्डेकर महाविद्यालयाचा ‘विस्तार’ सोहळा…

सिंधुदुर्गातील २८ महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग!

वेंगुर्ला
मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला “आजीवन अध्ययन व विस्तार विभाग द्वितीय सत्र प्रशिक्षण कार्यक्रम” नुकताच वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ महाविद्यालयातील विस्तार कार्य शिक्षक आणि विद्यार्थी व्यवस्थापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख प्रा. विवेक चव्हाण यांनी केले. विभागाच्या कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले की, “महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक आणि क्रीडा विभागाप्रमाणेच हा विभाग देखील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावतो. हा विभाग ‘समाज आणि शिक्षण’ यांच्यातील दुवा आहे. अन्नपूर्णा योजना, कारकीर्द प्रकल्प आणि उद्योग-भिमुख प्रकल्प यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थी तळागाळातील समाजापर्यंत पोहोचतात, ज्यातून त्यांचा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास होतो.”
या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ.बळीराम गायकवाड यांनी ऑनलाईन माध्यमातून विशेष उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या नेटक्या नियोजनाचे कौतुक केले. ते म्हणाले, “विस्तार कार्याचा मूळ उद्देश हा विद्यार्थ्यांना समाजाशी जोडणे हा आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतून मिळणारे अनुभव आत्मसात करावेत, जे त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरतील.”तसेच त्यांनी आगामी काळातील उपक्रमांसाठी आणि ‘उडान’ महोत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि अभ्यास मंडळाचे सदस्य प्रो. डॉ. कुणाल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी विस्तार कार्यातून सामाजिक भान जपले पाहिजे. विभागामार्फत राबवले जाणारे उपक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतात. विद्यार्थ्यांनी उपक्रमांचे संगणकीय दस्तऐवजीकरण आणि वार्षिक मूल्यमापन वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा.”
दुसरे प्रमुख अतिथी, हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’च्या अनुषंगाने विस्तार विभागाचे महत्त्व विशद केले. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केंद्राच्या कार्याची ओळख करून दिली. त्यांनी आंबा-काजूच्या विविध सुधारित जाती आणि फलोत्पादनशास्त्रातील विविध संकल्पना यावर सखोल माहिती दिली.

​तांत्रिक सत्र आणि ‘उडान’ महोत्सवाची तयारी प्रशिक्षणाच्या तांत्रिक सत्रात क्षेत्र समन्वयक डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत होणाऱ्या 'उडान महोत्सवा'ची माहिती दिली. या महोत्सवात होणाऱ्या पथनाट्य, भित्तीपत्रक, पोवाडा आणि समूह गायन यांसारख्या विविध स्पर्धांचे नियम आणि निकष त्यांनी समजावून सांगितले. तसेच, क्षेत्र समन्वयक डॉ. सुरेश पाटील यांनी विस्तार विभागाचे कागदपत्रे आणि अहवाल संगणकीय प्रणालीद्वारे कसे सादर करावेत, याचे सविस्तर सादरीकरण केले.

​ कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन न करता अशा उपक्रमांतून व्यवहारज्ञान मिळवणे काळाची गरज आहे. अन्नपूर्णा योजनेसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळतात. महाविद्यालयाचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या अशा रचनात्मक कार्याला सदैव पाठिंबा देईल.”
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनश्री पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छाऐवजी ‘कोकेडामा’ देऊन करण्यात आले, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.सदर कार्यक्रमात महाविद्यालय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर च्या वतीने कार्यक्रमास मार्गदर्शन मिळाले
यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय डॉ. व्ही. एम. पाटोळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. प्रभू यांनी तर आभार डॉ. सचिन परुळकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top