सावंतवाडी
कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत व उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. रविंद्र मडगावकर, तर प्रमुख उपस्थिती दक्षिण मध्य मुंबई महिला मोर्चा जिल्हा महामंत्री (भारतीय जनता पार्टी) श्रीम. श्रद्धा कोकणे यांची होती. यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सावंत, उपाध्यक्ष गोविंद लिंगवत, सचिव यशवंत राऊळ, संस्था संचालक सुरेश राऊळ, शंकर राऊळ, शशीकांत धोंड, कॅप्टन सुभाष सावंत, सूर्यकांत राजगे, गजानन निळकंठ राऊळ, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष सुभाष राऊळ, कलंबिस्त सरपंच सपना सावंत, वेर्ले सरपंच रुचिता राऊळ, सावरवाड सरपंच देवयानी पवार, माध्यमिक शाळा संस्था संघटना सचिव काका मांजरेकर, सैनिक पतसंस्था सहव्यवस्थापक प्रल्हाद तावडे, सांगेली हायस्कूल संस्था सचिव विश्वनाथ राऊळ आणि प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणाऱ्या दक्षिण मध्य मुंबई महिला मोर्चा जिल्हा महामंत्री श्रद्धा कोकणे यांनी आपल्याला गावाकडची ओढ असल्याने या पंचक्रोशीतील आदर्शवत असणाऱ्या कलंबिस्त हायस्कूलच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती सातत्याने घेत असल्याचे सांगितले आणि ग्रामीण भागात असूनही आपला गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी उपक्रमशील असणाऱ्या या शाळेबद्दल गौरवोद्गार काढले. प्रमुख अतिथी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर यांनी प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रशालेच्या बहुउद्देशीय सभागृहासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुभाष राऊळ यांनीही आपल्या मनोगतात प्रशालेच्या विविधांगी उपक्रमांचे कौतुक करून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मेहनत करून शाळेची शंभर टक्के यशाची परंपरा अबाधित राखावी असे आवाहन केले. यावेळी संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने प्रमुख अतिथी रविंद्र मडगावकर, श्रद्धा कोकणे तसेच सांस्कृतिक विभागप्रमुख व कला शिक्षक शरद सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक व अहवालवाचन प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले आणि आभारप्रदर्शन विलास चव्हाण सर यांनी केले. या उद्घाटन सत्रानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनपर ‘क्षितीज २०२५’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. याचे सूत्रसंचालन निवेदक शुभम धुरी यांच्या साथीने प्रशालेतील विद्यार्थी कु. वेदांत राऊळ व कु. माधुरी राऊळ यांनी केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला दशक्रोशीतील रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या दरम्यान महिलांसाठी घेण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात श्रीम. मिरा पास्ते या पैठणी विजेत्या ठरल्या. या संपूर्ण कार्यक्रमाला आजी माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी, आजी माजी विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
