१७ हजारांहून अधिक लाभार्थी अद्याप प्रलंबित..
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्डधारकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.तालुक्यातील एकूण १ लाख २ हजार ९६० लाभार्थ्यांपैकी ८५ हजार २५७ लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून अद्याप १७ हजार ७०३ लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. संबंधित लाभार्थ्यांनी तातडीने आपल्या जवळच्या रास्त भाव धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा धान्य लाभ बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आला आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी स्वतः धान्य दुकानात जाऊन ई-पॉस (e-POS) मशीनवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे किंवा ‘मेरा ई-केवायसी’ (Mera e-KYC App) व ‘मेरा रेशन’ (Mera Ration App) या ऑनलाइन अॅप्सद्वारे तात्काळ ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच ज्या लाभार्थ्यांचे आधारकार्ड व मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी लिंक नाहीत, त्यांनी संबंधित रास्त भाव धान्य दुकानदार किंवा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधून त्वरित अद्ययावत करावे.दरम्यान, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत कार्यरत/निवृत्त पेन्शनधारक असल्यास किंवा वार्षिक उत्पन्नात वाढ झाली असल्यास त्यांनी तातडीने ‘अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडणे’ आवश्यक असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
