शहराच्या हितासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू…

संजू परब;शिवसेना नगरसेवकांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट…

सावंतवाडी
सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. याच भावनेतून शिवसेना नगरसेवकांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राजकीय मतभेद असले तरी शहराच्या हितासाठी आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू,अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी दिली.
मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना संजू परब म्हणाले की, निवडणूक आणि राजकारण हे आपल्या जागी आहे, मात्र सावंतवाडी शहराचा विकास हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. आजची ही भेट केवळ औपचारिक नसून ती स्नेहाची आणि प्रेमाची आहे. विरोधक म्हणून आमची भूमिका मांडतानाच, शहराच्या प्रगतीसाठी जिथे गरज पडेल तिथे प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सर्व नगरसेवकांचे स्वागत केले आणि सकारात्मक चर्चा केली. नगरपालिका प्रशासन सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करेल. जुने अनुभवी आणि नवनिर्वाचित नगरसेवक एकत्र आल्याने शहराच्या विकासकामांना मोठी गती मिळेल,असा विश्वास जिरगे यांनी व्यक्त केला.या भेटीदरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. नगरपालिकेत लवकरच नवनियुक्त नगरसेवकांसाठी एका औपचारिक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रशासकीय स्तरावर लोकप्रतिनिधींचे अधिकृत स्वागत होऊन कामाला सुरुवात होईल.या सदिच्छा भेटीवेळी संजू परब यांच्यासोबत,बाबू कुडतरकर,अजय गोंदावले,शर्वरी धारगळकर,सायली दुभाषी,स्नेहा नाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top