गप्प होतो.. पण आता ती वेळ आलीय. मंत्री नितेश राणेंच्या ‘त्या’ X पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सिंधुदूर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवर अत्यंत सूचक आणि आक्रमक पोस्ट लिहीत मोठ्या संघर्षाचे संकेत दिले आहेत. “गप्प होतो.. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे!”, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आतापर्यंत पक्ष आणि कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण मौन बाळगले होते, मात्र आता समोरून होणारे आरोप सहन करण्याच्या पलीकडे गेले असून सत्य बोलण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी या पोस्टमधून सुचवले आहे.

नितेश राणे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आले असून, त्यांचा रोख नक्की कोणाकडे आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंब आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात आता नितेश राणे कोणता नवीन खुलासा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “आता ती वेळ आली आहे” असे म्हणत त्यांनी एका प्रकारे आगामी काळात होणाऱ्या मोठ्या गौप्यस्फोटाचा इशाराच दिला आहे. या पोस्टमुळे येत्या काही दिवसांत सिंधुदुर्गसह राज्याच्या राजकारणात मोठे आरोप-प्रत्यारोप पाहयला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top