भोसले इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात..

सावंतवाडी प्रतिनिधी
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि), मुख्याध्यापिका प्रियंका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या वार्षिक अहवाल वाचनाने झाली. उमा झारापकर व प्रीती डोंगरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्यानंतर गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘रिश्ते’ या संकल्पनेवर आधारित मानवी नातेसंबंधांचे भावविश्व अत्यंत सुंदररीत्या उलगडले. समूहनृत्य, गीत व व्हिडिओ सादरीकरणांतून आई-मुल, वडील-मुलगा, बहीण-भाऊ तसेच विद्यार्थी-शिक्षक व मैत्रीच्या नात्यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना कविता शिंपी म्हणाल्या की, आजच्या इंटरनेटप्रधान युगात नाती आभासी होत चालली आहेत. अशा परिस्थितीत नाते, संस्कार, शिस्त, कुटुंब तसेच शिक्षक-विद्यार्थी संबंधांची जाणीव करून देणारी ‘रिश्ते’ ही संकल्पना अत्यंत आवश्यक आहे. वायबीएसने निवडलेली ही थीम विद्यार्थ्यांना संवेदनशील, जबाबदार आणि उत्तम नागरिक घडविण्यास प्रेरणा देणारी आहे. विविध सांस्कृतिक-शैक्षणिक उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी शिंपी यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

संध्याकाळच्या सत्रात माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन ‘नवरस’ या भारतीय सौंदर्यशास्त्रातील संकल्पनेवर आधारित होते. नवरस म्हणजे मानवी भावनांचे नऊ प्रमुख प्रकार – श्रृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत व दृश्यप्रभावांच्या माध्यमातून या नऊ रसांचे प्रभावी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा म्हाडेश्वर, गायत्री शिंदे, क्रेसिडा डिसोझा तर आभार प्रदर्शन महिमा चारी व सोनाली शेट्टी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top