शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे

कुडाळ महाविद्यालयात रिसर्च सेंटर होण्यासाठी प्रयत्न करणार:आ. निलेश राणे

डॉ.स्मिता सुरवसे लिखित ‘ज्ञानज्योती १२ विज्ञान विरांगणा’ पुस्तकाचे प्रकाशन

कुडाळ प्रतिनिधी
शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे. या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तसेच कुडाळ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता सुरवसे यांनी मागणी केलेले रिसर्च सेंटर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे लिखित ज्ञानज्योती बारा विज्ञान विरांगणा या पुस्तक प्रकाशन प्रसंगी आ. राणे बोलत होते.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. डॉ. स्मिता सुरवसे यांनी ज्ञानज्योती बारा विज्ञान विरांगणा हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सहकार्यवाह आनंद वैद्य, महेंद्र गवस, अॅड. सुहास सावंत, लेखिका व प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमानिमित्त आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, अशा प्रकारचे पुस्तक लिखाण करून समाजाला दिशा देण्याचे काम डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले आहे. विज्ञान क्षेत्रामध्ये जाणे कामगिरी करून सुद्धा त्या अजूनही समाजापुढे आल्या नाहीत. त्यांना समाजापुढे घेऊन येण्याचे काम करण्यात आले आहे. हे त्यांचे कौतुकास्पद काम आहे. आपले शिक्षण आपला व्यवसाय हा समाजासाठी उपयोगी आला पाहिजे. आपल्या मातीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आम्ही सुद्धा परदेशात शिकलो पण या ठिकाणी मातीचे ऋण फेडण्यासाठी काम करत आहोत. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कितीही शिकलो तरी आपल्या माती बद्दल आपल्या गावाबद्दल प्रेम हे ठेवले पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये
नेहमीच शिक्षणाची दरी राहिली आहे. ही पुर्ण केली पाहिजे आणि आपले ध्येय हे भविष्याचे असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. डॉ. स्मिता सुरवसे यांनी या ठिकाणी रिसर्च सेंटर झाले पाहिजे. ही मागणी केली आहे ही मागणी निश्चितच आमच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी लेखिका तथा प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी सांगितले की मी जी काही या ठिकाणी उभी आहे. तुमच्याशी संवाद साधत आहे, ती केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. त्यांनी महिलांना शिक्षणाची दरवाजे खुले केले आणि सर्व क्षेत्रांमध्ये महिला दिसत आहेत असे त्यांनी सांगितले तसेच आतापर्यंत विज्ञानाचे जे काही पुरस्कार आहेत ते फक्त पुरुषांना मिळाले आहेत. बारा महिला विज्ञान विरांगना होत्या, पण त्यांना हे पुरस्कार प्राप्त झालेले नाही. त्यांनी खडतर काळात सुद्धा विज्ञानावर अनेक शोध केले पण त्यांचा विचार अजूनही झालेला नाही असे सांगून त्यांनी खंत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले. तर आभार डॉ. कमलाकर चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top