चाकूचे वार करणारा संशयित आरोपी १८ तासांत पोलिसांच्या ताब्यात…

कणकवली
कणकवली शहरात चायनीज सेंटर मधील नेपाळी कामगारावर चाकूने वर्मी घाव घालून गंभीर जखमी करणाऱ्या संशयित आरोपीच्या मुसक्या अवघ्या १८ तासांत सिंधुदुर्ग लोकल क्राईम ब्रँचच्या पथकाने कणकवली रेल्वे स्थानक परिसरात ७जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आवळल्या आहेत. सुनील इंदर परिवार (वय २७ मूळ नेपाळ, सध्या राहणार कणकवली) असे आरोपीचे नाव आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, डीवायएसपी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार एलसीबी पीएसआय अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे, हवालदार किरण देसाई यांच्या पथकाने केली.कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ६ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास अज्ञात इसमाने लोकेश बिस्त या नेपाळी कामगाराच्या डोक्यावर चाकूने वर्मी घाव घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात ७ जानेवारी रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास कणकवली पोलिसांसह सिंधुदुर्ग एलसीबीचे पथक करत होते. दरम्यान एलसीबी च्या पथकाला हल्ला केलेला आरोपी हा नेपाळ देशातील सुनील परिवार असून तो रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे समजले होते. एलसीबी च्या टीमने तात्काळ आरोपी सुनील याला रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या हवाली केले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top