सावंतवाडी
जिल्हा प्रेस क्लबने 2025-26 साठीचे पत्रकार पुरस्कार जाहीर केले आहेत. अनुभव, निर्भीडता, ग्रामीण प्रश्नांची मांडणी आणि डिजिटल पत्रकारितेतील नवे पर्व — या सर्वांचा समतोल साधत जाहीर झालेल्या पुरस्कारांमुळे पत्रकार वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.प्रेस क्लब भूषण पुरस्कार दैनिक ‘कोकणसाद’चे उपसंपादक लक्ष्मण आडाव यांना जाहीर करण्यात आला असून सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि लोकहितवादी पत्रकारितेचा हा सन्मान असल्याचे मानले जात आहे.तर कोकण लाईव्ह ब्रेकिंगचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांना जाहीर झालेला जीवन गौरव पुरस्कार हा जिल्ह्यातील निर्भीड पत्रकारितेच्या दीर्घ लढ्याची अधिकृत दखल मानली जात आहे.या वर्षी डिजिटल पत्रकारितेला स्वतंत्र सन्मान देत प्रेस क्लब डिजिटल मीडिया पुरस्कार शैलेश मयेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पारंपरिक माध्यमांबरोबरच सोशल मीडियातील जबाबदार पत्रकारितेची दखल घेण्यात आल्याने हा निर्णय विशेष चर्चेचा ठरतो आहे.ग्रामीण भागातील प्रश्न सातत्याने मांडणारे कसाल येथील सुनील गणपत आचरेकर यांना ग्रामीण पत्रकार पुरस्कार देत प्रेस क्लबने ‘तळागाळात पत्रकारिता’ करणाऱ्यांना न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
तर लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी संदेश पाटील यांना दिलेला कर्मचारी संघटना पुरस्कार हा पत्रकारितेच्या पडद्यामागील मेहनतीचा सन्मान म्हणून पाहिला जात आहे.६ जानेवारी रोजी साजऱ्या झालेल्या पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी नव्हे, तर समाजाशी बांधिलकी असलेले मिशन आहे, असा ठाम संदेश या घोषणेतून दिला जात असल्याचे बोलले जात आहे.या पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र असे असणार असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा वितरण सोहळा जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळाचे लक्ष वेधून घेणार आहे.पुरस्कार जाहीर होताच प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव, सचिव राकेश परब यांच्यासह विविध पत्रकार, संपादक आणि मीडिया प्रतिनिधींनी विजेत्यांचे अभिनंदन केले असून,
“हा निर्णय योग्य वेळी, योग्य लोकांसाठी” अशी प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.
