सिंधुदुर्गनगरी,ता.१३:
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील जगातील सर्वात मोठे असा गौरव केले जाणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या प्रतीची मंगळवारी १० डिसेंबर रोजी संध्याकाळी सोपान दत्तराव पवार या व्यक्तीने विटंबना केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभारत उमटत आहे. ही घटना निंदनीय आहे याचा सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या (भाजपा) वतीने निषेध करण्यात आला आहे.
या घटनेचा जलद गतीने तपास करून दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग आणि पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचेकडे निवेदन देऊन करणेत आली आहे. तसेच हा संविधानाचा केलेला अवमान आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा (भाजपा) च्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करणेत आला. यावेळी भाजप सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव व अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.