२५ ते २७ डिसेंबर या कालावधीत पिंगुळी महोत्सवाचे आयोजन…

कुडाळ,ता.१३:-
पिंगुळी ग्रामपंचायत, साई कला मंच, सर्व राजकीय पक्ष , सामाजिक व धार्मिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत प्रथमच पिंगुळी महोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला आहे. सलग तीन दिवस कुडाळ – एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै क्रीडांगण येथे सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत हा महोत्सव होणार आहे. यात राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा, जिल्हास्तरीय मिस पिंगुळी स्पर्धा, नाना – नानी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासह विविध स्पर्धां होणार आहेत. कोकणात प्रथमच या महोत्सवात अभंग रीपोस्ट या अभंगवाणी कार्यक्रमासह सांस्कृतिक व अन्य विविधांगी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी रसिकांसाठी असणार आहे. शोभायात्रेत विविध चित्ररथ हे खास आकर्षण असणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रणजीत देसाई व पिंगुळीचे सरपंच अजय आकेरकर यांनी सोमवारी येथील एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव गेल्या काही वर्षापासून विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कला, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त पिंगुळी गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हीच ओळख पिंगुळी महोत्सवाच्या माध्यमातून सर्वासमोर यावी. पर्यटक या गावात यावेत.या गावातील स्थानिक लोक व नवीन वास्तव्याला आलेल्या लोकांना एकत्रित करावे.त्यांना व्यासपीठ मिळावे, या प्रमुख उद्देशाने सर्व ग्रामस्थ, ग्रा.पं., सर्व संस्था यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव पिंगूळीवासीयांकडून संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना एक अप्रूप पर्वणी ठरेल, असा विश्वास श्री देसाई व श्री आकेरकर यानी व्यक्त केला. बॅ. नाथ पै संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, उद्योजक गजानन कांदळगावकर, ठाकर समाज जिल्हाध्यक्ष भगवान रणसिंग, रणजित रणसिंग, साई कला मंचाचे अध्यक्ष भूषण तेजम, अमित तेंडोलकर, पोलीस पाटील सतीश माड्ये व वैभव धुरी, शशांक पिंगुळकर, सचिन सावंत, सचिन पालकर, दर्शन कुडव, मयूर लाड, प्रणव प्रभू, राज वारंग आदी उपस्थित होते.

श्री देसाई म्हणाले, श्री देव रवळनाथ पंचायतन यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंगुळी गावात हा पिगुळी महोत्सव २०२४ होत आहे. हा महोत्सव पिंगूळीवासीयांकडून संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना एक अप्रूप पर्वणी ठरेल, असा हा महोत्सव असणार आहे. ज्यामध्ये ढोल ताशाच्या गजरात प पू.राऊळ महाराज समाधी मंदिरापासून ते बॅ. नाथ पै क्रीडांगण एमआयडीसी या कार्यक्रमास्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पिंगुळीतील कलाकारांचे नृत्याविष्कार, कलाविष्कार व गायनाचे कार्यक्रम, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार, ठाकर समाज बांधवाकडून कळसुत्री बाहुल्या, पांगुळ बैल, चित्रकथी यासारख्या विविध लोककलांचे सादरीकरण तसेच पिंगुळी गावातील हरहुन्नरी गायक, वादक कलाकार यांचा ऑर्केस्ट्रा होईल.

या महोत्सवाला हिंदी, मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. खाद्यपदार्थांसह अन्य विविध प्रकारचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी फनी गेम्स, आकाश पाळणे, जम्पिंग जॅम अशा विविध प्रकारच्या खेळांचा सहभाग असून ग्रामस्थासाठी मोफत आरोग्य शिबीर व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आणि रसिकांसाठी प्रश्नमंजुषा, मानाची पैठणी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top