प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन.
सावंतवाडी,ता १३:
परभणी येथे भारतीय संविधानाची समाजकंटकाकडून झालेली विटंबना आणि त्यातून आंबेडकर अनुयायांचा घडलेला उद्रेक या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सावंतवाडीतील आंबेडकर अनुयायांनी शांततेत एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच अशा विकृत प्रवृत्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन प्रांत अधिकारी हेमंत निकम यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, मंगळवारी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक असलेल्या कोरीव भारतीय संविधानाची एका समाजकंटकाने विटंबना केल्याने आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत बुधवारी मोर्चा काढला होता. या मोर्चाचे रूपांतर आंदोलनात होऊन मोठी जाळपोळही झाली होती. या घटनेनंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यातही उमटले होते. मात्र सावंतवाडीसारख्या शांत शहरात अशा घटना घडू नयेत व शांतता अबाधित राहण्यासाठी आंबेडकरी अनुयायांसह भारतीय संविधान प्रेमींनी एकत्र येत या घटनेवर सविस्तर चर्चा करून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच अशा समाजकंटकाला कठोर शिक्षा करावी व अशा घटना पुन्हा पुन्हा राज्यात घडणार नाहीत, याची दक्षता शासनाने घ्यावी असे आवाहन त्यांनी या निवेदनात केले आहे.
या निवेदनावर सुमारे शेकडो संविधान प्रेमींच्या सह्या असून ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी हेमंत निकम यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी रवी जाधव, वासुदेव जाधव, मिलिंद नेमळेकर, लाडू जाधव, ॲड. सगुण जाधव, भावना कदम, मंगेश जाधव, के. व्ही. जाधव, सुरेश कारिवडेकर आदी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.