सावंतवाडी, ता.०१:-
अलीकडे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना सरकारी नोकरी आणि मोठ्या पगाराची अपेक्षा ठेवून वावरताना दिसत आहेत. मुलं देखील आपल्या इच्छा – आकांक्षा या चांगल्या मोठ्या पगाराच्या बाळगून आहेत. मात्र असे असले तरी अलीकडचे सामाजिक चित्र विदारक आहे. वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून तुम्ही काहीही बना पण सर्वात प्रथम उत्तम माणूस बना, राष्ट्राचं कल्याण होईल, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी आरोस येथे व्यक्त केले. आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ आरोस संचलित, विद्या विकास हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक नॅशनल युनियन ऑफ सी फूडचे अध्यक्ष तथा मराठा समाज सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. प्रेमानंद साळगावकर, महेंद्र अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर तसेच जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ नगर विकास विभागाचे निखिल आनंद नाईक, संस्थेचे अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सचिव राजन नाईक, मुख्याध्यापक शिरीष नाईक, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रसाद मडूरकर, पत्रकार विश्वनाथ नाईक, साबाजी परब, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुख सौ. श्रद्धा मुळीक, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री कु. देवराव मुळीक, मुख्यमंत्री कु. साईश जाधव यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
