सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार ; माणगाव हायस्कूलचे चेअरमन सगुण धुरी यांचा आरोप 

सिंधुदुर्ग,ता.०१:-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीला कोणतेही उपस्थिती राहण्यासंदर्भात पत्र अगर मेल द्वारे कळविण्यात आले नाही आणि या स्पर्धेला उपस्थित न राहताच सदर विद्यार्थिनीला “उपस्थित प्रमाणपत्र” देऊन सिंधुदुर्ग क्रीडा विभागाने तर कहरच केला आहे. सातत्याने मैदानी सराव करणाऱ्या या माणगाव हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी सावंत हिचे आयुष्यच उध्वस्त करण्याचा प्रकार सिंधुदुर्ग क्रीडा विभागाकडून घडल्याचे समोर आले आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या माणगाव हायस्कूलचे चेअरमन सगुण धुरी यांनी याची थेट दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहीत संबंधित क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तर कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार निलेश राणे आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे ही थेट तक्रार करणार असल्याचेही सगुण धुरी यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कुडाळ तालुक्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची बारावी कला शाखेत शिकणारी वैष्णवी सावंत हिने चिपळूण येथील डेरवण येथे 19,20,21 ऑक्टोबरला पार पडलेल्या विभागीयस्तरीय मैदानी 100 मीटर हर्डल धावणे या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात तिचा द्वितीय क्रमांक येऊन ती राज्यस्तरासाठी पात्र ठरली होती.यानंतर गेले तीन महिने ती सातत्याने राज्यस्तरीय स्पर्धेत साठी माणगाव हायस्कूल च्या मैदानावर सराव करत होती. चार नोव्हेंबर च्या दरम्यान हायस्कूलचे क्रीडाशिक्षक नारायण उर्फ दीपक केसरकर यांनी ओरोस येथील क्रीडा विभागात कार्यालयात जात ही स्पर्धा केव्हा होणार आहे? याची विचारणा केली. त्यावेळी तुम्हाला रीतसर शाळेच्या मेलवर मेल येईल आणि व्हाॅट्सअपद्वारे पण कळविण्यात येईल असे क्रीडा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र 26 डिसेंबरला वैष्णवीला स्पर्धेत सहभागी झाल्यासंदर्भात सहभाग प्रमाणपत्र आले आणि तिला एकच धक्का बसला. यावेळी वैष्णवीचे वडील आत्माराम उर्फ दादा सावंत यांनी माणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्याशी थेट संपर्क साधला आणि सदर प्रकार कानावर घातला. यावेळी मुख्याध्यापक संजय पिळणकर,क्रिडा शिक्षक अमोल दळवी,नारायण केसरकर यांनी क्रीडा विभागाशी फोनद्वारे संपर्क साधल्यावर ही राज्यस्तरीय स्पर्धा 9 ते 11 नोव्हेंबरला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झाल्याची धक्कादायक माहिती सिंधुदुर्ग क्रीडा विभागाने दिली.हा सगळा प्रकार सिंधुदुर्ग क्रीडा विभागाच्या अंगलट आल्यानंतर या क्रीडा विभागाने सहाय्यक क्रिडा अधिकारी राहुल गायकवाड आणी सहाय्यक क्रिडा अधिकारी सचिन रणदिवे हे दोन सहाय्यक क्रीडा अधिकारी प्रतिनिधी स्वरूपात माणगाव हायस्कूल 26 डिसेंबरला दाखल झाले आणि आपली चूक झाल्याची त्यानी कबूल केले.आपल्याकडून पत्रव्यवहार झाला नसल्याचे कबूल करत चूक मान्य केली.पण तुम्ही ही कुठेही तक्रार करू शकता.अशी उद्दमपनाची उत्तरे त्यानी माणगाव हायस्कूल प्रशासनाला दिली. मुख्याध्यापक आणी क्रिडा शिक्षकांनी हा घडलेला प्रकार संस्था अध्यक्ष सगुण धुरी यांच्या कानावर घातल्यावर आक्रमक झालेल्या सगुण धुरी यांनी तत्काळ सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना पत्र लिहीत क्रीडा विभागाचे अक्षरशः वाभाडे काढले.हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी यांना खडबडून जाग आली आणि त्यांनी थेट संस्थाध्यक्ष सगुण धुरी यांना फोन लावून सदर प्रकरण मिटवा आपली चूक झाली असे सांगत प्रकरण मॅनेज करण्यासाठी जोरदार बिल्डिंग लावली. परंतु माजी वित्त बांधकाम सभापती आणी विद्यमान संस्थाध्यक्ष असलेले सगुण धुरी यांनी वैष्णवी सावंत या विद्यार्थ्यांनीचे हित लक्षात घेऊन आपण कारवाई करणार असल्याचा असा थेट इशारा क्रीडा अधिकाऱ्यांना दिला. यानंतर क्रीडा अधिकाऱ्यानी काही आपल्या मध्यस्थ्यामार्फत हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले.यातील काही मध्यस्थ आणी काही झारीतील शुक्रियाचार्यानी हे प्रकरण वाढू नये म्हणून सगुण धुरी यांच्याकडे विनवणी केली आणी दबावतंत्राचा वापर केला.परंतु सगुण धुरीनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी यांना थेट पत्र लिहीत जिल्हा क्रिडा अधिकारी,या विभागावर आणी अधिकार्‍यासह संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासह कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार निलेश राणे यांचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे सगुण धुरी यांनी स्पष्ट केले आहे.तर क्रिडामंत्री दत्ता भरणे यांचेही लक्ष वेधणार असल्याचे सांगत त्यांना या संदर्भात पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. दरम्यान शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या मुलीने तीन-चार महिने सातत्याने राज्यस्तरासाठी सराव केला, तिला कोणत्याही प्रकारे स्पर्धेत सहभागी होण्या संदर्भात कळवले जात नाही. परस्पर स्पर्धा उरकली जाते. स्पर्धेत सहभागी न होता तिला सहभाग प्रमाणपत्र दिले जाते.यामध्ये क्रीडा विभागात एखादे मोठे रॅकेट असण्याची शक्यता सगुण धुरी यांनी व्यक्त केली आहे.तर घाटमाथ्यावरील काही धनदांडग्या लोकांकडून बक्कळ पैसे घेऊन कोकणातील अशा विद्यार्थ्यांचे आणि खेळाडूंचे भवितव्यच उध्वस्त करण्याचा हा प्रकार असल्याची शक्यता शंका सगुण धुरी व्यक्त करत, संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे मात्र या सगळ्या प्रकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागासह क्रीडा क्षेत्रामध्ये हे मोठी खळबळ माजली आहे.यावर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर हे याची दखल घेऊन काय कारवाईची मागणी करणार? याकडे सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे. मात्र वैष्णवी सावंत सारख्या विद्यार्थिनीला न्याय मिळावा अशी मागणी त्याचे वडील आत्माराम उर्फ दादा सावंत आणी वैष्णवी सावंत यास माणगाव खोऱ्यातील पालक आणि व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top