सामाजिक कार्यातील सातत्य, संवेदनशीलता आणि नेतृत्वाची दखल.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. मानसी परब यांना प्रतिष्ठीत “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” बेळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही मोठी दाद मानली जात आहे.
कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा समिती तर्फे दरवर्षी समाजोपयोगी कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. त्याच परंपरेत यंदा विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबर मानसी परब यांची निवड झाली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 28 डिसेंबर 2025 रोजी लोकमान्य रंगमंदिर, रिज टॉकीज, बेलगाव येथे भव्यदिव्य आयोजनात संपन्न झाला. या सोहळ्यास चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सानिका बनारसवाले–जोशी यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते.
सौ. मानसी परब यांनी सामाजिक समस्यांकडे केवळ प्रतिक्रिया न देता, प्रत्यक्ष कामातून उपाययोजना उभारण्यावर भर दिला आहे. महिलांचे सशक्तीकरण, गरजू कुटुंबांना मदत, सामाजिक एकजूट, सांस्कृतिक कार्यक्रमांतून जनजागृती, तसेच तरुण पिढीला सकारात्मक व रोजगारासाठी दिशादर्शन अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. यामुळे त्यांचे कार्य सर्व स्तरांवर पोहोचले असून समाजमनावर चांगला परिणाम झाला आहे.
या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना समितीने सांगितले की,“सौ. मानसी परब यांचे कार्य नि:स्वार्थी, सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. समाजासाठी काम करणाऱ्यांना पुढे आणणे हीच या पुरस्कारामागची कल्पना असून, त्यांच्या योगदानामुळे इतरांना देखील प्रेरणा मिळेल.”
दरम्यान, मानसी परब यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक, शैक्षणिक व इतर संस्थांकडून सौ. परब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
