कुडाळात अनियंत्रित कारचा मध्यरात्री थरार…

एका कार सह दुकानांना धडक

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ शहरात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. लुटीचा प्रयत्न करून पलायन करणाऱ्या भरधाव बलेनो कारचा गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार धडक देत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारलाही ठोकर दिली. या अपघातात बलेनो कारसह उभी वॅनगार कार आणि एका दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुडाळजवळ एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वाहनाची लूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र हा प्रकार उघडकीस येताच संशयितांनी बलेनो कारमधून पलायन करण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर कार थेट दुकानांवर आदळली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात घेतली. पोलिसांनी चपळाईने तपासाची चक्रे फिरवत या लूट प्रकरणाशी संबंधित सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशेष बाब म्हणजे ताब्यात घेतलेले सर्व संशयित हे स्थानिक रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेमुळे कुडाळ शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास वेगाने सुरू असून, लूट प्रकरणामागील नेमका कट आणि अन्य सहभागींचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top