मुंबई येथे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते देण्यात आले निवडीचे पत्र..
मुंबई, प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि जगातील तब्बल ४१ पेक्षा अधिक देशात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, तसेच कोकण प्रदेशाध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या उपस्थितीत प्रा. रुपेश पाटील यांना सदर निवडीचे निवडपत्र बहाल करण्यात आले. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया टीम सिंधुदुर्गचे सदस्य व शिलेदार अमित पालव, आनंद धोंड, शैलेश मयेकर, मिलिंद धुरी, आनंद कांडरकर यांसह व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे तमाम पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि देशभरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान मंगलप्रभात लोढा (मंत्री, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता), हेमंत पाटील (विधान परिषद सदस्य व अध्यक्ष, हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र), स्वामी श्रीकंठानंद ,प्रवर्तक (जागृत नाशिक जागृत भारत जागृत विश्व),
डॉ. शुभ विलास (लाईफस्टाईल कोच, कथाकार आणि लेखक), ब्रिजेश सिंह (महासंचालक व सचिव, माहिती व जनसंपर्क), अशोक काकडे (जिल्हाधिकारी, सांगली), पाशा पटेल, राजश्री पाटील (अध्यक्ष, गोदावरी समूह व पुरस्कार निवड प्रक्रिया प्रमुख), विशाल पाटील (संपादक, लोकशाही), आशितोष पाटील (संपादक, जय महाराष्ट्र), गगन महोत्रा, प्रदेशाध्यक्ष (इंटरनॅशनल चीफ‘व्हॉईस ऑफ मीडिया’), अनिल म्हस्के (प्रदेशाध्यक्ष ‘व्हॉईस ऑफ मीडिया’) आदी मान्यवर व्यासपीठ उपस्थित होते.
अशोक काकडे यांनी उपस्थित सर्व पत्रकार यांना कर्तव्यपणाची दीक्षा दिली. ‘आवाज विश्वातल्या पत्रकारांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन, ‘विजयी भव’ आणि ‘जिकंलेले योद्धे’ या पुस्तकांच्या मराठी, हिंदी, इंग्लिश, कव्हरचे प्रकाशन, मासिक ‘नयन अक्षर’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार आणि पत्रकारिता या विषयांवर कार्यक्रमात चिंतन झाले.
दरम्यान प्रा. रुपेश पाटील यांच्या या निवडीबद्दल पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रा. रूपेश पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या जास्तीत जास्त समस्या सोडविण्यासाठी आणि तळागाळातील अन्यायग्रस्त बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संस्थेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत रूपेश पाटील यांनी व्यक्त केले.