बोरिवली ते गोराई जल प्रवास आता फक्त १५ मिनिटांत – मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन”

मुंबईला जलमार्गाची नवी गती : बोरिवली रो-रो जेट्टीच्या कामाला सुरुवात

बोरिवली जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल ; मंत्री नितेश राणे

मुंबई(प्रतिनिधी)
बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन आज मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या जेट्टीमुळे बोरिवली येथे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना जलमार्गाने सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. यापूर्वी या प्रवासाला एक तास तीस मिनिटे एवढा वेळ लागत होता परंतु, या रो-रो जेट्टीमुळे हा प्रवास वेळ केवळ पंधरा मिनिटांत पूर्ण होणार असल्याची ग्वाही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली. तसेच या जेट्टीचे काम वेळेत पूर्ण करून ही रो-रो सेवा नागरिकांच्या सेवेत लवकरच कार्यान्वित केली जाईल असेही यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले.

यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार संजय उपाध्याय, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांसह स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते.

बोरिवली येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा तसेच स्थानिक प्रवासाला गती मिळावी यासाठी बोरिवली फेज १ रो-रो जेट्टी सेवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या जेट्टीचे भूमिपूजन शुक्रवार दि. ११ जुलै २०२५ रोजी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले कि, भाजप सरकारच्या कार्यकाळात ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन होते, त्या कामांचे लोकार्पण देखील होते.

बोरीवली रो-रो प्रकल्पासंदर्भात बोलताना ते म्हणाले, कि, ज्या प्रवासाला यापूर्वी एक तास तीस मिनिटे लागत होती तो प्रवास आता पंधरा मिनिटांत पूर्ण होणार आहे. जशी मुंबई मध्ये मेट्रो सेवा आहे, त्याचप्रमाणे मुंबईच्या MMR भागात वॉटर मेट्रो सेवा देखील सुरु व्हावी असा आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काम सुरु केलेलं आहे. त्यामुळे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आपल्या महायुती सरकारची आहे.’ असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top