कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट

मत्स्यव्यवसाय विभाग उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार; मच्छी मार्केटमधील दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना करणार

भाजपच्या आमदार उमा खापरे यांच्या मुद्द्यालावर मंत्री नितेश राणे यांची विधीमंडळात माहिती

नागपूर प्रतिनिधी
कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी कोळंबी सोलणाऱ्या महिलांसाठी विशेष हातमोजे (ग्लोव्हज) उपलब्ध करून देण्याची घोषणा केली, तर मासळी बाजारातील कचरा व दुर्गंधी दूर करण्यासाठी विभागामार्फत ठोस उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले.
भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधीमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, कोळंबी सोलताना मच्छिमार भगिनींच्या नखांना व बोटांना खूप त्रास होतो, कधी कधी रक्तही निघते. हा त्रास कमी करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत तसेच परदेशातून उत्तम दर्जाचे ग्लोव्हज मागवले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत हे ग्लोव्हज लवकरच या मासळी विक्रेत्या महिलांना वाटले जातील. यामुळे त्यांच्या हाताला संरक्षण मिळेल आणि काम सुलभ होईल, असे राणे यांनी सांगितले.

मासळी बाजारातील दुर्गंधी आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर बोलताना मंत्री म्हणाले, विविध मच्छीमार्केटमधील कचरा आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी आमच्या विभागाने आधीच उपाययोजना सुरू केल्या आहेत. याबाबत आमदार उमा खापरे यांच्यासोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सविस्तर माहिती देण्यात येईल.
……………
मासळी विक्रेत्यांच्या स्थलांतरणाबाबत सकारात्मक चर्चा
दरम्यान, क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी विक्रेत्यांना महात्मा जोतिबा फूले मंडईमध्ये स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरही मंत्री राणे यांनी स्पष्टीकरण दिले. शिउबाठाचे आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी हा मुद्दा उपप्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी मी स्वतः मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत पालिका मुख्यालयात बैठक घेतली. मासळी बाजाराच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा मच्छिमारांना दाखवला. त्यावेळी कृती समितीमधील सर्वपक्षीय सदस्य उपस्थित होते. त्यांच्या सूचना आम्ही ऐकल्या. त्यानुसार आराखड्याच काय बदल करता येतील, याबाबत चर्चा झाली. आता अंडरग्राउंड जागेत हलवण्याबाबत त्यांचे आक्षेप आहेत. मात्र, तात्पुरत्या काळासाठी अंडरग्राउंड जागा वापरली जाणार असून, नंतर त्यांना पुन्हा वरच्या मजल्यावर उत्तम जागा उपलब्ध करून दिली जाईल, याबाबत सकारात्मक चर्चा पूर्णत्वास आलेली आहे, असेही राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top