शिरशिंगे येथे काजू बागायतीला भीषण आग; धोंड कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथे आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास काजू बागायतीला लागलेल्या भीषण आगीत शेतकरी अंकुश रामा धोंड, रमेश रामा धोंड आणि सुरेश रामा धोंड यांच्या बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काजू हंगामाच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्याने धोंड कुटुंबियांचा हाताशी आलेला घास हिरावला गेला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,आज शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी दुपारी शिरशिंगे येथील धोंड यांच्या काजू बागेतून अचानक आगीचे लोळ बाहेर येताना स्थानिक नागरिकांनी पाहिले. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. ही माहिती शेतकरी अंकुश, रमेश आणि सुरेश धोंड यांना मिळताच त्यांनी ग्रामस्थांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अनेक काजूची झाडे जळून खाक झाली होती.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बागेतून जाणाऱ्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या आणि त्यातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या उन्हाचा तडाखा आणि बागेतील वाळलेला पालापाचोळा यामुळे आगीने वेगाने संपूर्ण बागेला वेढले.
सध्या काजूचा हंगाम सुरू होत आहे. झाडांना मोहोर येऊन फळधारणा होण्याची ही वेळ असतानाच आग लागल्याने वर्षभराची मेहनत मातीमोल झाली आहे. “वर्षभर मुलाप्रमाणे झाडांची जोपासना केली, मात्र डोळ्यादेखत बागेची राख झाली,” अशी भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या आगीत धोंड कुटुंबियांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेचा संबंधित महसूल विभाग आणि कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी येऊन नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे. तसेच, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्यास महावितरणने देखील याची दखल घेऊन पीडित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top