निर्विवाद यश हे जनतेचे प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे…

विशाल परबः जनतेच्या आशीर्वादातून यश; सुसज्ज रुग्णालय आणि रोजगारनिर्मितीवर आमचा भर…

सावंतवाडी
सावंतवाडी नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाने मिळवलेले निर्विवाद यश हे जनतेच्या प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. येणाऱ्या काळात जनतेला अपेक्षित विकासकामे करताना, जुन्या जाणत्या नेत्यांना सोबत घेऊन शहराचा ठोस विकास आराखडा तयार केला जाईल. सावंतवाडी नगरपरिषद राज्यात अव्वल ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा ठाम विश्वास भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, अमित परब, केतन आजगांवकर यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, “आजचा दिवस विजयाचा आणि आनंदाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय सुकर झाला. रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून राज्यातील ३०० हून अधिक नगरपालिकांमध्ये भाजपची कमळ फुलले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.” त्यांनी सावंतवाडी आणि वेंगुर्लेच्या जनतेचेही आभार मानले.सावंतवाडीच्या भविष्यातील गरजांवर भाष्य करताना परब यांनी आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय आता थांबवा. सावंतवाडीच्या नागरिकांसाठी वर्षभरात सर्व सोयींनी युक्त आणि सुसज्ज रुग्णालय आम्ही उभारणार आहोत. कोकणी युवकांना आज रोजगाराची नितांत गरज आहे. गंभीर उपचारांसाठी आपल्याला गोवा-बांबोळीवर अवलंबून राहावे लागते, ही परिस्थिती आम्हाला बदलायची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.आमदार दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधताना परब म्हणाले की, “केसरकर मंत्री आणि आमदार असताना त्यांनी एखादा मोठा रोजगाराभिमुख प्रकल्प आणायला हवा होता. मात्र, आता आम्ही त्यांच्या साथीने असे प्रकल्प आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. सावंतवाडीच्या विकासासाठी त्यांनी आम्हाला साथ द्यावी, भविष्यात आम्ही एकत्र काम करण्यास तयार आहोत.” युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील आणि तो आम्हाला शिरसावंद्य असेल, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top