सावंतवाडीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार…

नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोंसले यांचा निर्धार

सावंतवाडी

नगरपालिकेत झालेला आमचा विजय हा खऱ्या अर्थाने सर्व सावंतवाडीकरांचा विजय आहे. शहराचा विकास अपेक्षित असलेल्या नागरिकांनी आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने घरोघरी जाऊन आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या, त्या सर्व समस्या दूर करून सावंतवाडीला एक सुंदर आणि विकसित शहर बनविण्याचे आमचे स्वप्न आम्ही निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोंसले यांनी व्यक्त केला.
विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सावंतवाडीकर नागरिकांचे मनोमन आभार मानले. त्या म्हणाल्या की, सावंतवाडीच्या जनतेने राजघराण्यावर नेहमीच प्रेम केले असून राजघराण्याने देखील जनतेच्या सेवेसाठी कायम पुढाकार घेतला आहे. हा लोकसेवेचा वारसा यापुढेही अखंड सुरू ठेवला जाईल. आई-वडील आणि राजघराण्यातील ज्येष्ठ मंडळींच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले, अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
शहराच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी मोती तलावाच्या संवर्धनावर भर दिला. सावंतवाडीची शान असलेला ऐतिहासिक मोती तलाव अधिक सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी विशेष काम केले जाईल. तसेच शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारून आरोग्य सुविधा सक्षम करण्याला आपले प्राधान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने सावंतवाडीकरांना अपेक्षित असलेला विकास आपण निश्चितच करून दाखवू, अशी ग्वाही श्रद्धा सावंत भोंसले यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top