जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवार (दि 22 रोजी) घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत राज्यस्तरीय योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2024-25 व 2025-26 या कालावधीतील योजनानिहाय व कामनिहाय स्थिती तपासण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश तसेच प्रत्यक्ष कामांची सद्यस्थिती याबाबत संबंधित यंत्रणांकडून अहवाल मागविण्यात आले होते.निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या. तसेच ज्या कामांची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, ती तात्काळ पूर्ण करून कार्यारंभआदेश देण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना देण्यात आले. सन 2024-25 अंतर्गत दायित्व निधीची मागणी तात्काळ सादर करण्याचे आदेश देताना, आगामी काळातील जिल्हा परिषद आचारसंहिता लक्षात घेऊन प्रशासकीय मान्यता वेळेत पूर्ण होतील, निधी अखर्चित अथवा समर्पित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.याशिवाय, जिल्ह्यातील सर्व पायाभूत सुविधांसाठी युनिक आयडी तयार करण्याचे शासनाचे निर्देश असून, त्यानुसार MHUID पोर्टलवर युनिक आयडी निर्मितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. 31 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्ह्यातील सर्व पायाभूत सुविधांचे युनिक आयडी तयार करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top