कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पहाटे ४ च्या सुमारास घटना
कुडाळ प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या कडेला कोसळली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबई – गोवा महामार्गाचे काम काही ठिकाणी अजूनही अर्धवट
आहे. वेताळ बांबर्डे पुलानजिक गोडकर कुटुंबियांच्या घरासमोर महामार्गाचे काम अपूर्ण असून हा भाग फारच अरुंद आहे. अनेकदा वाहनचालकांना याचा अंदाज न आल्याने यापूर्वी देखील अपघात घडले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून देखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गोडकर कुटुंबीय आजही भितीच्या छायेखाली वावरत आहेत.
आज देखील मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना कारचालकाला महामार्गाचा अंदाज न आल्याने कार रस्त्याच्या कडेला कोसळली. यात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
