मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून खून,परीसरात खळबळ

वेंगुर्ला अणसुर पाल मडकीलवाडी येथील घटना

वेंगुर्ला प्रतिनिधी
तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अणसुर पाल मडकीलवाडी, ता. वेंगुर्ला येथे घडली. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत व आरोपी यांच्यात वारंवार घरगुती वाद व भांडणे होत होती. घटनेच्या दिवशी वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसलेल्या असताना आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याने घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने थेट आईवर गोळी झाडली. ही गोळी वासंती सरमळकर यांच्या डाव्या बाजूच्या छातीला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी सौ. जागृती जयेश सरमळकर (मूळ रा. अणसुर मडकीलवाडी, सध्या रा. विनायक रेसिडेन्सी, कॅम्प वेंगुर्ला) यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी उमेश वासुदेव सरमळकर (रा. अणसुर मडकीलवाडी, ता. वेंगुर्ला) याच्याविरोधात बीएनएस कलम १०३ (३) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, २७, २९
आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करीत आहेत. या घटनेमुळे अणसुर परिसरात शोककळा पसरली असून आई-मुलाच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top