तुळस येथे मोफत शस्त्रक्रिया रजिस्ट्रेशन शिबिर ; विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी नोंदणीची सुवर्णसंधी

वेंगुर्ला
ग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना दर्जेदार व तज्ज्ञ वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात,या सामाजिक उद्देशातून वेताळ प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग – तुळस आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भ.क.ल.वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया रजिस्ट्रेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर बुधवार,दि २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तुळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करून आवश्यक त्या शस्त्रक्रियांसाठी नोंदणी करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये हृदयविकारावरील अँजिओप्लास्टी व बायपास, युरोलॉजी अंतर्गत मूत्रपिंड व प्रोस्टेट शस्त्रक्रिया,अस्थिरोग विभागातील मणका व गुडघ्यावरील शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील शस्त्रक्रिया,डोळ्यांच्या आजारांवरील मोतिबिंदू व कृत्रिम भिंगारोपण, स्त्रीरोग विभागातील विविध शस्त्रक्रिया,कान-नाक-घसा विभागातील टॉन्सिल,नाकाच्या पडद्यावरील व कानाच्या हाडांवरील शस्त्रक्रिया,तसेच जनरल सर्जरी अंतर्गत हर्निया,पित्ताशय,अपेंडिक्स, अल्सर,फिशर,फिस्टुला व मूळव्याध यांसारख्या आजारांसाठी नोंदणी केली जाणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी उपचार पूर्णतः मोफत असून,रुग्णांनी शिबिरास येताना केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड तसेच आधार कार्ड अनिवार्यपणे सोबत आणावे,असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया व उपचारांचा लाभ दिला जाणार आहे.
ज्या रुग्णांकडे मेडिक्लेम,आरोग्य विमा किंवा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य कार्ड उपलब्ध आहे, अशा रुग्णांनी शिबिरापूर्वीच आगाऊ माहिती व्यवस्थापनास द्यावी, जेणेकरून उपचार प्रक्रिया अधिक सुलभपणे पार पडेल,असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळस व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून,गंभीर आजारांवरील महागड्या शस्त्रक्रिया मोफत होण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे.या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महेश राऊळ (९४०५९३३९१२), प्रथमेश सावंत (८७८८५८३६३७), डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) आणि गौरी आडेलकर (९०२२१७९५२५) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन कोकण कला व शिक्षण विकास संस्था अध्यक्ष दयानंद कुबल व वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top