युवकाच्या डोक्यावर बिअरची बाटली मारून दुखापत…

मालवण
स्कुबा डायव्हींगच्या बोटीतून पर्यटकांना घेऊन किनाऱ्यावर येत असताना एका तरूणाला जुन्या वादातून काही युवकांनी डोक्यावर बियरची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव नितीन द्वारकानाथ तोडणकर असे आहे. त्याच्या हाताला, डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या राजेंद्र कांदळगावकर याही तरूणाच्या डोकीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो देखील गंभीर जखमी झाला आहे. या दोघांनाही उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात तात्काळ नेण्यात आले. मात्र त्यांची दुखापत गंभीर असल्याने दोघांनाही अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या मारहाणीत सचिन आडकर यालाही मारहाण करण्यात आल्याचे समजते.दांडी किनाऱ्यावर संशयीत युवकांनी एकत्रित येत ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी नितीन तोडणकर यांच्या कुटुंबियांकडून पोलीसात तक्रार देण्याची कार्यवाही रात्री उशीरापर्यंत सुरू होती. तर मारहाण करणाऱ्या गटाकडूनही परस्पर विरोधी तक्रार देण्याची कार्यवाही सुरू होती. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. दांडी किनाऱ्यावर पर्यटकांच्या समोरच घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक महेश कोयंडे, सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. पूनम चव्हाण यांनी पोलीस स्थानकात भेट देत घटनेची माहिती जाणून घेत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.दरम्यान, संशयीत आरोपांनी तात्काळ अटक करण्याची मागणी पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केलेली आहे. आपला भाऊ पर्यटन व्यवसाय करत असताना त्याच्यावर प्लॅनिंग करून जिवे ठार मारण्याचाच हल्ला करण्यात आलेला आहे. यात तो गंभीर जखमी असल्याने संशयीतांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top