सावंतवाडी
“आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आणि सामाजिक परिवर्तनासाठी लेखणीचा जो वारसा सुरू केला, तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी आजच्या पत्रकारांवर आहे. पत्रकारितेची मूल्ये आणि सत्यनिष्ठा जपतानाच, समाजाला पोखरणाऱ्या अमली पदार्थांसारख्या संकटांविरुद्ध आता पत्रकारांनी आपल्या लेखणीतून बुलंद आवाज उठवला पाहिजे,” असे प्रेरक आवाहन ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’च्या वतीने आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करताना गावडे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गची भूमी ही नररत्नांची खाण आहे आणि बाळशास्त्री हे त्यातील लखलखते रत्न आहेत. सध्या जिल्ह्यात वाढत चाललेले चरस आणि गांजा यांसारखे पाश्चात्य अंमली पदार्थांचे जाळे तरुण पिढी उद्ध्वस्त करत आहे. हे वास्तव समाजासमोर आणून युवा पिढीला वाचवण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.
जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. ‘एकत्र तर सर्वत्र’ या ब्रीदवाक्याप्रमाणे पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी ही संघटना ५६ देशांत कार्यरत असून, ही एकजूट शासन-प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला जिल्हा सचिव शैलेश मयेकर, कार्याध्यक्ष अनंत धोंड, सहसचिव संजय पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत यांच्यासह कवी दीपक पटेकर,प्रशांत मोरजकर, नाना धोंड, साबाजी परब, आशिष धोंड, श्रीरंग सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी, तर आभार प्रदर्शन शैलेश मयेकर यांनी केले.
