5 फेब्रुवारीला मतदान,७ फेब्रुवारीला मतमोजणी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद आणि
पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यामुळे ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. “मिनी विधानसभां” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे.
या निवडणुकांत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांचा समावेश असून, एकूण १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे.
मतदारांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी वापरली जाणार असून, पंचायत समितीसाठी एक आणि जिल्हा परिषदेसाठी एक असे दोन मत देण्याची व्यवस्था असणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.
निवडणूक कार्यक्रम (संक्षेप)
अर्ज स्वीकारण्याची तारीख: १६ ते २१ जानेवारी २०२६
अर्ज छाननी: २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारीची अंतिम मुदतः २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटपः २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ नंतर)
मतदानः ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
मतमोजणीः ७ फेब्रुवारी २०२६
ग्रामीण भागातील सत्तेची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नेतृत्व यावर निवडणूक रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
आगामी काही दिवसांत प्रचाराला वेग येणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात राजकीय वातावरण तापणार हे निश्चित आहे
