सावंतवाडी
जानेवारी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सावंतवाडीतील ‘महेंद्र अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी) स्थान मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. अकॅडमीच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पियुष बर्डे, वेदांत पारकर, अविष्कार डिचोलकर आणि सखाराम काळे यांचा समावेश आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण परिश्रमांना आता यशाचे फळ मिळाले आहे.
आपल्या यशाचे श्रेय देताना विद्यार्थ्यांनी सांगितले की, “देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून आम्ही तयारी करत होतो. महेंद्र अकॅडमीचे उत्कृष्ट प्रशिक्षण, कडक शिस्त आणि प्रशिक्षकांचे वेळोवेळी मिळालेले योग्य मार्गदर्शन यामुळेच आमचे हे स्वप्न आज सत्यात उतरले आहे.”
देशसेवेची ओढ असणाऱ्या आणि सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महेंद्र अकॅडमी हे एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे. या घवघवीत यशामुळे अकॅडमीच्या प्रशिक्षण पद्धतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना घडविणाऱ्या महेंद्र अकॅडमीच्या सर्व प्रशिक्षकांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळातही या अकॅडमीतून अनेक तरुण देशसेवेसाठी सज्ज होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
