वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडीत झालेल्या नुकसानाची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी…

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्याचे आश्वासन…

सिंधुदुर्गनगरी:
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, करण्यात आलेल्या पंचनाम्यांनुसार अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सावंतवाडी तहसीलदारांनी सविस्तर अहवाल सादर केला असून, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासकीय निकषांनुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागामध्ये ६१ घरांचे नुकसान झालेले आहे. त्याचे देखील त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, तसेच स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या हानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात जिल्हा पातळीवरील आढावा बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः धोकादायक झाडांची छाटणी तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व उपाययोजना गतीने राबविण्यात येत आहेत. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन प्रशासनाने सज्ज राहावे, यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top