सातत्यपूर्ण मेहनत व सरावामुळेच मिळाले यश..
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त सैनिक संघ यांच्यावतीने लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात मळगाव येथील ओम मदन शिरोडकर याने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. सातत्यपूर्ण मेहनत व सरावामुळेच त्याला हे यश प्राप्त झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त सैनिक संघाच्या वतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धा २०२५-२६ सावंतवाडी येथील मोती तलाव परिसरात रविवार, ७ डिसेंबर रोजी पार पडली. या स्पर्धेत ओम शिरोडकर याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. त्याला ३,५०० रुपयांची रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यापूर्वीही सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत ओम शिरोडकर याने द्वितीय क्रमांक पटकाविला होता. धावणे, खेळणे, सायकलिंग आदी क्रीडा प्रकारांची ओमला विशेष आवड असून तो या सर्व प्रकारांचा नियमित सराव करतो. सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावरच त्याला हे यश मिळाले आहे. या यशाबद्दल ओम शिरोडकर याचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
