इन्सुली-सावंतवाडी मार्गावर अवैध मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्कची धडक कारवाई…

दत्त मंदिराजवळ बोलेरो टेम्पो मधून ८.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त; एक संशयित ताब्यात..

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-सावंतवाडी मार्गावर दत्त मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत अवैध मद्याची वाहतूक करणारा चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली येथील अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता इन्सुली-सावंतवाडी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी संशयास्पद महिंद्रा बोलेरो कॅम्पर (क्र. MH-08-W-1856) या वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या पाठीमागील भागात भाजीच्या रिकाम्या क्रेटखाली लपवून ठेवलेले गोवा बनावटीचे विविध बँडचे ३५ बॉक्स अवैध विदेशी मद्य आढळून आले.या प्रकरणात मद्याची किंमत ३ लाख ४९ हजार ३२० रुपये तर संबंधित चारचाकी वाहनाची किंमत ५ लाख रुपये अशी एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित मद्य वाहतूक करणारा संशयित ताजील सरदेर शेख (वय २७, रा. सावंतवाडी) यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई मा. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर तसेच सिंधुदुर्गचे अधीक्षक किर्ती शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम तसेच जवान रणजित शिंदे, दीपक वायचुंडे, सतीश चोगुले, अभिषेक खवळी व सागर सुर्यवंशी यांनी यशस्वीपणे पार पाडली.या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली येथील दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top