विशाल परब यांची राजकीय पुनरागमनातून निर्णायक भूमिका; रवींद्र चव्हाण विशाल परब यांचे किंग मेकरचे बॅनर झळकले…
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेच्या निकालातून भारतीय जनता पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, युवा नेते विशाल परब यांनी या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत वर्षभरापूर्वीच्या राजकीय संघर्षाचा हिशेब चुकता केल्याचे चित्र दिसून आले आहे.सुमारे एक वर्षापूर्वी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाबाबत महायुतीत निर्माण झालेल्या तणावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपामध्ये तीव्र अस्वस्थता होती. सावंतवाडीची जागा शिवसेनेला सोडू नये, या मागणीसाठी जिल्ह्यातील प्रमुख भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यावेळी आमदार दीपक केसरकर यांना जागा सोडल्यास प्रचार न करण्याचा निर्णय बैठकीत जाहीर करण्यात आला होता. मात्र वरिष्ठ पातळीवर महायुतीचा निर्णय झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचा लाभ होत दीपक केसरकर पुन्हा आमदार झाले.यानंतर मात्र “ताकद कोणाची?” हा वाद अधिक तीव्र झाला. पदाधिकारी फोडाफोडीपासून ते उघड नाराजीपर्यंत परिस्थिती विकोपाला गेली. आमदार केसरकर यांनी शिवसेनेची ताकद अधिक असल्याचे संकेत दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.ही नाराजी दूर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेत अपक्ष उमेदवारी लढवलेल्या विशाल परब यांचे निलंबन रद्द करत त्यांची पक्षात घरवापसी करून घेतली. युवा नेतृत्वावर विश्वास टाकत त्यांना पुन्हा सक्रिय भूमिका देण्यात आली.आज सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणूक निकालातून त्या निर्णयाचे फलित स्पष्टपणे दिसून आले. महायुतीशिवाय झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत भाजपाची ताकद निर्णायक ठरल्याचे मत निकालानंतर व्यक्त केले जात आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयामागे भाजपाची संघटनात्मक ताकद होती, हे या निकालातून अधोरेखित झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.विजयाच्या जल्लोषात हजारो कार्यकर्त्यांनी ‘किंगमेकर’ असा उल्लेख असलेले कटआउट्स झळकावत या यशाचे श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि युवा नेते विशाल परब यांना दिले. निकालाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लावण्यात आलेले रविंद्र चव्हाण, विशाल परब तसेच सौ. वेदिका परब यांचे कटआउट्स आणि बॅनर्स हे निवडणूक निकाल मैदानाचे खास आकर्षण ठरले.
