वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ‘ताज’ समुहाचे जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभे राहणार:पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न

स्थानिकांना निर्माण होणार रोजगार जिल्ह्यासाठी ठरणार ऐतिहासिक निर्णय

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित (५ स्टार) हॉटेल उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळक ओळख निर्माण होणार आहे.सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

शिरोडा–वेळाघर येथील जमिनीबाबत मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा. लि. (ताज समुह) यांनी सादर केलेल्या पुरक करार पत्रावर चर्चा करण्यासाठी आज पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ताज समुहाच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या पंचतारांकित हॉटेलसंदर्भात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC), स्थानिक ग्रामस्थ आणि ताज समुह यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. ग्रामस्थांना दोन टप्प्यांमध्ये मोबदला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हा मोबदला येत्या एक ते दोन आठवड्यांत अदा करावा तसेच यासंदर्भातील सर्व प्रलंबित केसेस मागे घ्याव्यात, अशा स्पष्ट सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यटनाशी निगडित व्यवसाय, स्थानिक हस्तकला, वाहतूक, हॉटेल व सेवा क्षेत्राला चालना मिळणार आहे. पंचतारांकित हॉटेलमुळे उच्च दर्जाचे पर्यटक जिल्ह्याकडे आकर्षित होऊन सिंधुदुर्गचा पर्यटन विकास नव्या उंचीवर पोहोचणार आहे.

या बैठकीस आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन), ताज समुहाचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top