२५ डिसेंबरपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन; विजेत्यांना मिळणार भरघोस बक्षिसे….
सावंतवाडी
आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आरोंदा हायस्कूल, आरोंदा यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ निमित्त भव्य जिल्हास्तरीय समूहगीत आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पी. वाय. नाईक पुरस्कृत आणि त्यांच्या पत्नी स्व. सौ. पुष्पा प्रभाकर नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
ही चित्रकला स्पर्धा सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे. यात पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा पार पडणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३००० आणि २००० रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार असून, उत्तेजनार्थ १००० रुपयांचे पारितोषिक, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धकांसाठी पेपर आयोजकांकडून दिले जाणार असून, इतर साहित्य व रंग विद्यार्थ्यांनी स्वतः सोबत आणायचे आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील या समूहगीत स्पर्धेत पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी ‘देशभक्तीपर गीत’ हा विषय अनिवार्य असून, प्रत्येक संघात १० विद्यार्थ्यांचा समावेश असावा असे सांगण्यात आले आहे. स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वाद्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून, स्पर्धकांना आपली वाद्ये व वादक स्वतः सोबत आणावे लागतील. या स्पर्धेतही चित्रकला स्पर्धेप्रमाणेच आकर्षक रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्हे प्रदान केली जाणार आहेत.
नियोजन आणि नोंदणी
या दोन्ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आरोंदा हायस्कूल येथे सुरू होतील. विशेष म्हणजे, सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजकांतर्फे भोजनाची मोफत सोय करण्यात आली आहे. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण त्याच दिवशी दुपारी ४:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष संदेश परब, उपाध्यक्ष रघुनाथ नाईक, सचिव वासुदेव देऊळकर, खजिनदार रूपेश धरणे, मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व शिक्षक-कर्मचारी प्रयत्नशील आहेत. स्पर्धेसाठी आपली नावे २५ डिसेंबर २०२५ पर्यंत कला शिक्षक चंदन गोसावी (८३९०१४१४५५) किंवा मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे (९९५८४६३२९६) यांच्याकडे व्हॉट्सॲपवर किंवा प्रत्यक्ष भेटून नोंदवावीत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
