मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात युवक जागीच ठार

कणकवली प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरट तिठा येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात राजापूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीने ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अमन गणी खतिक (वय २२, रा. राजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अमन खतिक हा कामानिमित्त आपल्या दुचाकीने राजापूरहून सावंतवाडी येथे गेला होता. काम संपवून तो पुन्हा आपल्या घराच्या दिशेने परतत असताना हुंबरट तिठा परिसरात ही दुर्घटना घडली. महामार्गावरून सर्व्हिस रोडकडे वळणाऱ्या चिरेवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात अमनची दुचाकी ट्रकच्या मागील भागावर प्रचंड वेगाने आदळली.

अपघाताची भीषणता

ही धडक इतकी भीषण होती की, अमनच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने मदतकार्य सुरू केले आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवला.

कुटुंबीयांचा आक्रोश घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी
धाव घेत पंचनामा केला. अमनच्या अपघाताची बातमी समजताच त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अमनचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अमनच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे राजापूर परिसरात आणि मित्रमंडळींमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top