छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर माणगाव येथे संपन्न;५०० शेतकऱ्याचा सक्रिय सहभाग

माणगाव प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर हा शासनाच्या महसूल यंत्रणेमार्फत राबवत असलेला स्तुत्य उपक्रम असून तो जनतेच्या रखडत असलेल्या कामाना अधिक गतिमान करणारा आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. बळीराजा हा देशाचा खरा पोशिंदा आहे.त्यामुळे महसूल यंत्रणा शेतकऱ्यांच्यासाठी आता सदैव तत्पर असून रखडत पडलेली अधिकाधिक प्रकरणे तात्काळ मिटवली जातील असे प्रतिपादन कुडाळच्या प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी केले.
कुडाळ तालुक्याच्या माणगाव मंडळाच्या अधिपत्याखाली, त्रिमूर्ती मंगल कार्यालयात शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. व्यासपीठावर प्रमुख उपस्थितात प्रांताधिकारी ऐश्वर्या कोळूसे मॅडम, तहसीलदार सचिन पाटील, जि प सदस्य दीपक नारकर व रुपेश कानडे,प. स.सदस्य योगेश धुरी व घावनळकर, माणगाव सरपंच मनीषा भोसले, वाडोस सरपंच संजना सावंत, कालेली सरपंच समृद्धी कालेलकर,सचिन धुरी, तसेच घावनळे व नानेली सरपंच आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार सचिन पाटील म्हणाले,”शासनाच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचा हेतू लोकांना जास्त काळ ताटकळत न ठेवता समस्यांचा निपटारा जलद करणे, सामान्य लोकांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, सतत संपर्क ठेवणे, लोकांच्यात महसूल यंत्रणेबद्दल असलेली अनामिक भीती दूर करणे आदि असंख्य हेतू समोर ठेवून आम्ही प्रशासनाने घालून दिलेला हा उपक्रम आपणांसमोर ठेवत आहोत. थोडक्यात शासन आपल्या दारी ही संकल्पना अधिक प्रभावी ठरणार आहे. लोकांनी आम्हाला मोलाची साथ दिल्यास कोकणच्या विकासावर त्याचा अनुकूल परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याला जवळपास 500 च्यावर शेतकऱ्यांनी आपला सक्रिय सहभाग दाखवला. प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र टेबल रचना केलेली होती. खुद प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी वर्ग समस्या सोडवण्याच्या कामी कमालीचा गुंतलेला दिसला. काही प्रकरणांचा निपटारा जागच्या जागी करण्यात आला. अनेक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तळीगाव येथील पारधी कुटुंबांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता महसूल यंत्रणेने एक महिन्यात खुला करून दिला याबद्दल ग्रामस्थांनी महसूल यंत्रणेचे आभार मानले. यावेळी मनीषा भोसले, दीपक नारकर, रुपेश कानडे आदी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. एकंदरीत पूर्वीच्या काळी महसूल यंत्रणेवर “शासकीय काम आणि सहा महिने थांब” हा बसलेला ठपका आता केव्हाच कालबाह्य झाला असल्याचे आशादायक चित्र शिबिरात पाहण्यास मिळाले.
हा मेळावा यशस्वी होण्यासाठी माणगाव तलाठी सुशांत पाटील, नमसगाव तलाठी अश्विनी दराडे, मंडळ अधिकारी माणगाव व कुडाळ तहसील कार्यालयामधील इतर स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बांदेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top